मराठी आपल्या श्वासात भरून राहू दे !

mumbai
25 वर्ष झाली महराष्ट्राच्या राजधानीत पहिलं पाऊल टाकलं. एकाला पत्ता मराठीत विचारला. त्यानं वाट चुकल्या वाटसरूकडं बघावं, तसं मला बधून गेत विचारलं, 'कहाँ जाना है भाई?' अजूनही मला त्याचं उत्तर देता आलेलं नाही! माझ्याच घरच्यांनी माझ्या घरात 'कोण पाहिजे तुम्हाला?' विचारावं तसं झालं.

भवताल माणसांनी भरला होता. पण या गर्दीत मराठी बोलणारा-कळणारा कुणी असेल, यावर विश्वास ठेवायला माझं मन तयार नव्हतं. कुठल्या अनोळखी मुलखात येऊन पडलोयसं झालं.

700 वर्षापेक्षा अधिक काळ मार्ग गेलाय. ज्ञानदेवांपासून कुसुमाग्रजांपर्यंत आपण मराठी बोलत - लिहीत-वाचत आलोय. पण अजून ती महाराष्ट्राच्या राजधानीत बळचणीला अंग चोरून उभी आहे. तिचे हाल काही सरेनात. महाराष्ट्राचं मंत्रालय सारा कारभार मराठीतून केल्यासारखं करीत, मराठी साहित्य संमेलनांना अनुदान देतं, प्रसरंगाप्रसंगानं भित्तीपत्रकांचे उत्सव करतं आणि उत्साहानं 'आपल्या आवडीच्या' कामला पुन्हा जुंपून घेतं. आजच्या घडीला दादर, गिरगाव, लालबाग आणि विलेपार्ल्यात मराठीचा श्वास चालू आहे इतकचं !

आता तिथंही मराठी माणूस मराठी माणसाला हिंदीत पत्ता विचारू लागला आहे. असली मानसिकता कुठल्या संकटाला निमंत्रण देतेय, हे सर्व मराठी भाषाप्रेमींनी विचारात घेण्यासारखं आहे! मुंबईत महानगरपालिका, मराठी रंगभूमी, पोलीस, बेस्य इथं मराठी माणसांची हुकुमत आहे. बाकी सारा बहुभाषिक -बहुरंगी जल्लोष!

अखिल मानवजात एक आहे, हा लाडका सिद्धांत बोलून दाखवून आपण आपल्या विशालतेचा गौरव करतो. नव्या काळच्या नव्या म्हणी 'मुंबई तुमची, भांडी घासा आमची' ऐकाव्या लागतात. अशी विपरीत, अपमानित स्थिती आज घरोघरी घुसलीय. असून मालक घरता म्हणती चोर त्याला असा उलटा न्याय झालाय.

थोडं मागल्या काळात, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी ज्यांनी आपली सारी शक्ती वापरायची शपथ घेतली होती, मराठी माणसाचा (मुंबईतल्या) विश्वास पदरात घेतला होता, त्यांनी बदलत्या काळात बदलत्या आपली पकड सैल केली आणि आपल्याच 'शाश्वत' सुखात सुकावले !

महाराष्ट्रात मुंबई आहे, पण मुंबईत मराठी नाही. हे सपशेल खरं असलं तरी महाराष्ट्रात मराठी माणूस अल्पसंख्‍याक नाही, हे मुंबईतल्या इतर भाषिकांनी पक्कं ध्यानात ठेवावं आणि बर्‍या बोलानं आपल्या राज्यात पाहिजे तर निघू जावे.

आता आणि या पुढं, महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाच्या सरकारनं, मराठी माणसाला सर्व क्षेत्रांत प्रथम खास सवलती द्याव्यात ! तरच मराठी माणूस मुंबईत उठून दिसेल ! इतर भाषिकांच्या मतांच्या जाळ्यात अडकून आपला, ‍महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा विश्वासगात करू नये !

आठवणीनं - व्यासपीठावरून ' मराठी पाऊल पडते पुढे, वाजती मराठीचे चौघडे' म्हणत गर्जणार्‍या सरकारं पाऊल मागं का? देशाच्या भल्यासाठी - काश्मीरसाठी वेगळे कायदे करता येतात. मग महाराष्ट्रासाठी नवे कायदे का करू नयेत? परंतु आपणा मराठी माणसांची, नव्या सहस्त्रकातली अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. मराठी आपल्या अख्या जगण्यात श्वासात भरुन राहिली पाहिजे!

मराठी बोला ! मराठीतच लिहा आणि मराठीतच वाचा - मराठी साहित्य, कला आणि संस्कृती जपा आणि जोपासा ! एक विसरू नका, जगात नावाजायला मराठी भाषा अपुरी पडत नाही!

आता अधिक अंत न बघता, नव्या शतकाच्या !सहस्त्रकाच्या पहाटवेळी, निव्वळ मराठीत बोलायची मनातून शपथ घेऊ या. ज्यांना मराठी हेत नाही आणि जो पाहुणा आहे त्याच्याशी शक्य त्या भाषेत संवाद साधू या!

मराठीनं केला कानडी भ्रतार हे विसरून मराठीनं केला मराठी भ्रतार असं एकमुखानं गाऊ या ! आपण आता शिवजयंतीला आणि साहित्य संमेलनात मराठीचे गोडवे गाऊन भागायचं नाही! महाराष्ट्रात - मराठी माणसाच्या मनात - स्वप्नात मराठी पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे. मराठीतून लिहितो -वाचो - बोलतो आणि मराठीपण जगतो, तो कुणीही का असेना, तो आपला मराठीच मानू या ! आईच्य दुधाला पर्याय असूच शकत नाही, हे निसर्गाचं जालीम उत्तर आहे. तसचं मातृभाषेला, मराठी मुलखात तरी, दुसरा पर्याय असूच शकत नाही! आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागेल.

संपूर्ण मुंबईत मराठी मालकीची उपाहारगृहं हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी का आहेत? मराठी कुटुंबात जन्मदात्यांना 'आई, बाबा' म्हणणारी मुलं शोधूनही का सापडत नाहीत? घरोघरी मराठी वर्तमानप‍त्र आग्रहानं का घेतलं जात नाही? मराठी माणूस चार महिन्यांतून एक निवडक मराठी चित्रपट आणि एक मराठी नाटक का बघत नाही? लिहिता-वाचता येणार्‍यांनी वर्षातून पाच मराठी निवडक पुस्तक का वाचू नयेत? महाराष्ट्र-आपला देश कसा आहे हे मराठी कुटुंबानं आयुष्यात एकदा तरी का बघू नये? मराठी माणसानं नोकरचाकर म्हणून - सटरफटर कामं करीत केविलवाणं जगणं सोडून देऊन, मराठीची तुतारी फुंकत शेती, व्यापार, उद्योगात आणि कला, साहित्य, क्रीडा, विज्ञानात आपली मुद्रा का उमटवू नये ?

अजूनही मराठी माणसाला मराठीशिवाय, मंत्रालय आणि न्यायालयात ठेचकाळत का हिंडावं लागतं? आकाशवाणी, दूरदर्शन आणि काही अपवाद सोडल्यास मराठी वर्तमानपत्रंही धड मराठी भाषा वापरीत नाहीत. चार-पाच मुद्रणसंस्‍था सोडल्यास पुस्तक छपाईचाही 'आनंद' आहे. आकाशवाणी, दूरदर्शनातल्या अनेक जबाबदार अधिकार्‍यांना प्रमाण मराठी भाषा बोलता आणि लिहिताही येत नाही ! प्राथमिक, माध्‍यमिक आणि महाविद्यालयातल्या मराठी शिकवणार्‍या कैकांना निकोप मराठी येत नाही. तिथं इतरांची काय कथा! अखेर प्रश्न आहे तो, नुसत्या साहित्य संमेलनाचे मोसमी वार्षिक उत्सव भरवून, ज्यांना पाहिजे त्यांना मिरवता येईल. पण, मायमराठीला सावता येईल का?

('आपले वसंतश्री' या दिवाळी अंकातून साभार)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...