कॉलेजमध्ये प्रेयसी नजरेसमोर नसेल, तर कलेजा खलास होतो. नव्याच्या नवलाईसारखे लग्नाचे दिवस अनुभवत असताना बायको माहेरी गेली तरीही तीच अवस्था... जन्मजन् मांतरीचं नातं हे असंच असतं...
........
पुढच्या बेंचवर बसली आहे. मी दुसऱ्या रांगेत तिच्या मागे. तिच्या गालावर खळी पडते. मधेच ओढणी सावरते ना, तेव्हा कळ येते रे... लेक्चरभर मी तिच्याचकडे पाहात असतो. क्लास संपवून बाहेर पडताना ती माझ्याकडे पाहून हसते. अधेमधे काहीतरी कारण काढून मागे बघतेच... तीच रे तीच... तिच्याशिवाय जगणंच अशक्य आहे...'
माझ्या एका मित्रानं मला हे ऐकवलं होतं कॉलेजमध्ये जाण्याच्या आधीच! तसंही प्रत्येक मुलाचं हे असं नाहीतर थोडं वेगळं स्वप्न असतंच ना... आपण त्या त्या काळात सुरू असलेल्या सिनेमाचे हिरो आहोत. आपण कॉलेजमध्ये एंट्री मारल्या मारल्या अनेकींची हृदयं उडत उडत आपल्याकडे येणार आहेत, असंही बऱ्याच महाभागांना वाटत असतं. आमच्या ग्रुपमध्ये असाच एक हिरा होता. कोणतीही मुलगी जवळून गेली, की हा म्हणायचा, 'पाहिलंस... कसली जबरदस्त लाइन देत होती मला...' 'अरे माकडा... थोबाड पाहिलंस का स्वत:चं...' हे आम्ही मनात म्हणायचो.
........
आपण प्रेमात पडावं किंवा कोणीतरी आपल्या प्रेमात पडायचं, असं बहुतेकांना वाटत असतं. ज्यांना यातलं काहीच वाटत नाही, ते पुढे जाऊन ... असो, पुढे जाऊन काय, त्या विषयी प्रत्येकानं कधी ना कधी चर्चा केलेली असतेच! तर, अशी स्वप्नं पाहात पाहात मुलं कॉलेजात येतात, पाच वर्षं राहातात. (काहीजण जास्त काळ... प्रेमच हो...) काहींचं स्वप्न पूर्ण होतं, तर काहींचं अपुरं राहातं. काहीजणांचं काही काळासाठी पूर्ण होतं आणि भाळी येते अश्वत्थाम्यासारखी भळभळणारी जखम... स्वप्नं पूर्ण न होणारे किंवा काहीच काळासाठी होणारे सध्या बाजूला ठेवू. ही जी प्रेमात पडलेली मंडळी असतात ना, ती सध्या आपल्या कामाची आहेत. एकदा का प्रेमात पडलं (दोघंही आणि एकमेकांच्या!) की सारं जगच बदलून जातं यांच्यासाठी. कालपर्यंत मित्रांसोबत शेड्यूल ठरवणारा तो, आता वेगळा वागू लागतो. त्याची प्रत्येक गोष्ट आता तिच्या आवडीनुसार ठरू लागते. तिला हे आवडतं, ते आवडत नाही, नको रे... ती म्हटलीय घरीच जा... हे असं व्हायला लागतं. तो गडी इतका गुरफटतो, की मित्रमंडळी विसरतो... मित्रांसोबतचा दंगा विसरतो... थोडक्यात तो बॅचरल राहात नाही. हे प्रेम जसजसं पुढे पुढे जायला लागतं, तसतशी आणखी गडबड होऊ लागते. ती जर कुठे गावाला वगैरे जाणार असेल, याचा तीन-चार दिवस भेटणार नसेल, तर मात्र गडबड होते. आपला भिडू दोन दिवस आधीपासूनच डिम होतो. मित्रांमध्ये एकच पालुपद सुरू असतं, 'ती भेटणार नाही रे...' मित्रही कंटाळतात; पण हा काही पालुपद सोडत नाही. तीन-चार दिवसांसाठीही मजनू होणं याला मंजूर नसतं. बरं पब्लिक सांगत असतं, की अरे ती नाहीये तीन-चार दिवस, तर आतापासूनच प्लॅन्स आख. बऱ्याच गोष्टी राहून गेल्यात. मागच्या दोन पाटर््यांनाही आला नव्हतास तू. आता चान्स आहे, तर करू एखादी पाटीर्... पण नाही. हा गडी कुठल्यास आमिषांना भुलणारा नसतो. 'तिला काय वाटेल रे... ती गावी गेल्यावर मी पाटीर् केली तर...' असं अखेरचं वाक्य बरेच सारे पॉझेस घेऊन म्हणतो, तेव्हा मित्रांना याला उचलून फेकावंसंच वाटतं...
अखेरीस तो दिवस येतो. ती गावी जाते. निघताना फोन होतो. प्रवासात मेसेजस सुरूच असतात. हा उदास चेहऱ्यानं वावरत असतो. उदास गाणीच ऐकतो. मित्र त्याला सुधारायचं ठरवतात. आपल्या पाटीर्त ओढून नेतात. हा ओढग्रस्तीला लागल्यासारखा चेहेरा करून पाटीर्त जातो. मित्र दंगा करत असतात हा दोन तासापूवीर् घेतलेला पहिलाच ग्लास तसाच हातात घेऊन बसतो. मित्र चिडतात, ओरडतात; पण याचं लक्ष फक्त सेलफोनवर... तिचा मेसेज, तिचा फोन... बास्स...
आता पुढचं दृश्य. दोघांचं लग्न होतं. राजा-राणीचा संसार सुरू होतो. अजूनही दोघं प्रेमात तेवढेच आकंठ बुडालेले असतात. 'तू तिथं मी' अजूनही सुरूच असतं. त्याचं ऑफिसला जाणं, ऑफिसातून येणं... तिचंही ऑफिसला जाणं आणि येणं... मग एवढ्या मोठ्या विरहानंतर एकमेकांना भेटणं... 'तू जेवलास का?' 'तू जेवलीस का?' असे फोन करत राहाणं... हाय... काय दिवस असतात ते... रम्य... (कसे काय तेव्हा असे वागत होतो... हे काही वर्षांनंतरचं...) घरात दोघंच असतील, तर दोघांनी मिळून स्वयंपाक करणं... एकमेकांना वाढणं... एकत्र जेवणं... जेवल्यानंतर गप्पा... (बास...) आणि घरात इतर असतील, तर हे सारं त्यांच्या नजरा चुकवून... एकूण काय ते दिवस फारच भन्नाट आणि फुलपाखरी असतात. (प्रत्येक अक्षरानंतर टिंबं दिली तरी चालतील एवढे भन्नाट!) मग तो दिवस उगवतोच. ती माहेरी जाणार असते. हा पुन्हा आधीपासून उदास. तीही उदास. त्यामुळे घर उदास. हिच्या सूचना सुरू होतात... दूधवाला येईल. दूध कमी सांग. काकूंना पोळ्यांबरोबर भाजीही करायला सांगितली आहे. डबा नक्की ने. वेळेवर जेव. मी फोन करेनच... पण इथं नसेन ना आठवडाभर... काळजी घे हं राजा... (आईशप्पत...) मग तोही उदास उदास बोलतो... तूही काळजी घे. वेळेवर जेव आणि शक्य तितक्या लवकर परत ये... जायलाच हवं का गं? (हाय...) मग तो तिला एसटी किंवा रेल्वे स्थानकावर सोडायला जातो. गाडी निघेपर्यंत हे एकमेकांच्या डोळ्यांत पाहात मूक आक्रोश करत असतात. गाडी सुटते. हा परततो... तसाच उदास उदास... आता घर खायला उठतं. काय करावं सुचत नाही. मित्रांना बोलवावं का... नको, ते घराचा बार करतील आणि तिला ते आवडणार नाही... मग दिवसरात्र फोन, मेसेजेस सुरू राहातात. शेवटी न राहावून हा एक दिवस आधीच सासुरवाडीला जातो आणि तिला एकदाचा घेऊन येतो...
लग्नाला काही वर्ष उलटलेली असतात. संसार वेलीवर एक किंवा दोन फुलंही आलेली असतात. आता याला मित्रांची आठवण येऊ लागते. बऱ्याच दिवसांत आपण कट्ट्यावर गेलेलो नाही. यारदोस्तांशी गप्पा हाणलेल्या नाहीत. पाटीर्ही झालेली नाही, याची त्याला जाणीव होऊ लागते. तीदेखील कातावलेली असते. घर-ऑफिस-मुलं या चक्रात गुरफटून गेलेली असते. 'काडीचाही उपयोग नाही या माणसाचा,' या निष्कर्षापर्यंत ती येऊनही दोनेक वर्ष झालेली असतात. (राजुड्या ते हा माणूस... केवढा हा फरक!) अगदी थोडक्यात सांगायचं, तर दोघंही पक्की संसारी बनलेली असतात. हिनं चिडचिड करावी आणि त्यानं दुर्लक्ष करावं. फोन? ते तर कधीचेच बंद झालेले असतात. शब्दांमधली ती टिंबं टिंबं जाऊन फक्त स्वल्प आणि अर्धविराम उरलेले असतात. मग तो त्याच्या दृष्टीनं सुदिन उगवतो. कोणाचंतरी लग्न किंवा मुलांची सुटी या निमित्तानं ती माहेरी जाणार असते. हा उत्साहानं सारी तयारी करून देतो. बॅगा भरायला मदत करतो. मुलांचंही आवरतो. 'चल लवकर... गाडी सुटेल,' असं ओरडत सगळ्यांना गाडीत घालून, गाडीत बसवून टाटा करून स्थानकाच्या बाहेर पडतो आणि पहिला फोन मित्रांना करतो... 'आज माझ्या घरी रे...' पाटीर् रंगात येते. याचा फोन वाजतो. 'बायकोचा असेल, जरा गप बसा,' हा मित्रांना दामटवतो. तेही अनुभवानं शांत बसतात. 'बरं बरं... हो जेवलो. तुम्ही कसे आहात? मुलं कशी आहेत? पोहोचलात, की फोन करा,' एवढं म्हणून फोन कट करतो आणि पाटीर् सुरू राहाते. दुसऱ्या दिवशी उशीरा उठतो. निवांत आवरतो. बाईंना दोन दिवस सुटी देतो. पूवीर्च्या हॉटेलवर जातो. तिथंच काहीतरी खाऊन ऑफिसला जातो. येताना कट्ट्यावरच थांबतो. वायू प्रदूषणात भर घालतो. तिथूनच कुठेतरी पुन्हा पाटीर् होते. घरी येतो आणि ताणून देतो.
असेच दोन दिवस जातात. यालाही त्या स्वातंत्र्याचा कंटाळा येऊ लागतो. घर खायला उठतं. बायको आणि मुलांशिवाय आपण अपूर्णच आहोत, याची जाणीव होऊ लागते. काय करावं हे सुचत नाही. त्याच्या ती घरी नसल्यामुळे सुटका सुटका झालेला जीव आता तुटका तुटका झालेला असतो. शेवटी रजा टाकतो आणि बॅग उचलून तिच्या माहेरी चालू पडतो. दातात तो दिसल्यानंतर आश्चर्यचकीत झालेली ती आणि तिच्याकडे पाहात राहिलेला तो... विलक्षण सुंदर दृश्य असतं ते... बाकी सारं क्षणांपुरतं. जन्मजन्मांतरीचं असतं ते आपलं नातं हे सत्य त्यांना उमगतं आणि उतरतो तो फक्त आनंद...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें