MY मराठी!


आपल्या भाषेचा अभिमान आपणच बाळगायला हवा ना? कशासाठी आपण हिंदी, इंग्रजीचा आधार घेतो? दुसऱ्या भाषांना माझा विरोध नाही; पण महाराष्ट्रात मराठीलाच प्राधान्य असायला हवे, यात काही चूक नाही. आपल्या
भाषेचा प्रसार आपणच करायला हवा...


रोजगाराच्या अनेक संधी पुणे, मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे परप्रांतीयांचे राज्यामध्ये स्थायिक होण्याचे प्रमाण गेल्या दशकात प्रचंड प्रमाणात वाढले आहे. पर्यायाने मराठेतर भाषेचा (मुख्यत्वे हिंदी आणि इंग्रजी) वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मराठीवर हिंदी/ इंग्रजीचे आक्रमण होऊ लागल्यामुळे मराठी भाषेचे अस्तित्व धोक्‍यात येऊ लागले आहे. मुंबईमध्ये तर सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेमध्ये काही विचारणे खूप कठीण झाले आहे. मराठी भाषा जपण्यासाठी मराठी
भाषकांनी पुढाकार घेणे खूप गरजेचे आहे. तरच मराठीचे अस्तित्व अबाधित राहील.

मी पुण्यात एका बहुउद्देशीय कंपनीमध्ये नोकरी करतो. कामासाठी मला कंपनीच्या आशियातील ग्राहकांशी नियमितपणे संपर्क येतो. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे, प्रत्येक ठिकाणी फोन केल्यानंतर सुरवातीला तेथील स्थानिक भाषेतील संवाद सुरू होतो, इंग्रजी भाषेसाठी काही वेळ थांबावे लागते. तथापि व्हिएतनाम, जपान या देशांमधील व्यवहार तर मुख्यत्वे त्यांच्या स्वतःच्या भाषेतच चालतात. माझे वरिष्ठ अधिकारी फ्रान्समध्ये असतात. तेही मला त्यांच्या भाषेबद्दल कौतुकाने सांगत असतात. परदेशी
भाषेचा- विशेषतः इंग्रजीचा वापर ते कटाक्षाने टाळतात. फ्रान्समध्ये प्रत्येक व्यवहार हे फ्रेंच भाषेमध्येच चालतात. हे सगळं बघून प्रगत देशदेखील भाषाभिमानी आहेत हे दिसून येतं... पुण्यामध्ये मात्र एका रुग्णालयामध्ये फोन केला, तरी मराठी न वापरता हिंदी भाषेमध्ये स्वागत केले जाते.

मराठी भाषेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. हिंदी/इंग्रजीच्या आक्रमणामुळे सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषेचा वापर कमी होऊ लागला आहे. मला नेहमी असे अनुभव येतात. किंबहुना समोरच्या व्यक्तीला मराठी येत नसावं हे गृहीत धरून त्याच्याशी हिंदीमध्ये संभाषण सुरू होतं. याचं उदाहरण म्हणजे क्रेडिट कार्ड, कर्जे इत्यादींसाठी फोन करणारे बॅंकांचे प्रतिनिधी. मला असाच एकदा पुण्याच्या फोनवरून क्रेडिट कार्डसाठी फोन आला. समोरच्या व्यक्तीनं हिंदीमध्ये संभाषण सुरू केलं. मी विचारलं, ""बाई, तुम्ही दिल्ली, पंजाब, बिहार कुठून बोलताय?'' असं विचारल्यावर तिनं मराठीमध्ये उत्तर दिलं, ""सर, मी पुण्यातून बोलतीय,'' मी तिला विचारलं, ""अहो, मग हिंदी का?'' यावर त्या बाईनं उडवाउडवीची उत्तरं दिली. आपण मराठी लोकांनीच प्रत्येक ठिकाणी मराठीचा आग्रह धरणं आवश्‍यक आहे.

एकदा काही कारणासाठी मी औरंगाबादला गेलो होतो. पुण्याला परत येताना रात्री नऊच्या सुमारास नगरपासून काही अंतरावर जेवणासाठी एक हॉटेलवर बस थांबली. मी आणि माझी पत्नी आम्ही जेवत होतो. इतक्‍यात एक एस.टी.बस मार्गस्थ होण्याची घोषणा झाली. ती हिंदीमध्ये करण्यात आली. मला वाटलं, दुसऱ्यांदा घोषणा होईल ती मराठीमध्ये होईल; परंतु दुसरी घोषणाही हिंदीमध्येच झाली. मराठीमध्ये घोषणा न झाल्यानं मी अस्वस्थ झालो आणि त्या व्यक्तीकडे जाऊन मराठीमध्ये घोषणा न करण्याचं कारण विचारलं. त्यानं
सांगितलं, की सर्व लोकांना मराठी समजत नाही. मी त्याला महाराष्ट्रात असल्याची जाणीव करून दिल्यावर त्यानं मला विचारलं, ""तुम्ही मनसेचे का?'' मी त्याला विचारलं, ""एखाद्या पक्षामध्ये असणाऱ्यानंच मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे अशी अट आहे का?'' या प्रश्‍नावर मात्र तो निरुत्तर झाला आणि मला आश्‍वासन दिलं, की तुम्ही परत इथं कधीही आलात तर तुम्हाला इथं मराठीतच घोषणा ऐकू येईल. आजकाल मोठ्या मॉल्समध्ये मराठी लोकच हिंदीचा वापर सर्रास करताना आढळून येतात. एकदा एका इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या दुकानात एका वस्तूची चौकशी करण्यासाठी मी गेलो होतो. त्या वेळी तिथल्या प्रतिनिधीनं मला हिंदीमध्ये माहिती सांगण्यास सुरवात केली. मी त्याला सांगितलं, ""मला फक्त मराठी भाषा येते'' तेव्हा त्या व्यक्तीनं एक मराठी अनुवादक बोलवला. मग तो अनुवादकाला माहिती देत असे आणि अनुवादक मला मराठीमध्ये रूपांतर करून मला त्या वस्तूची माहिती देत होता. आमचा हा संवाद बघून त्या दुकानातील इतर ग्राहकही आश्‍चर्यानं पाहत होते.

कोणत्याही भाषेला विरोध करण्याचा माझा हेतू नाही; परंतु झपाट्यानं प्रगती होत असलेल्या महाराष्ट्रानं आपली मराठी भाषा, आपली संस्कृती जपणं, हे तितकंच महत्त्वाचं आहे. हिंदी अथवा इंग्रजी बोलू नये असं मी सांगणार नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी प्राधान्य मराठी भाषेला असावं; शक्‍य नसेल तिथं आपण इतर भाषा वापरणं गरजेचं आहेच. कारण जागतिकीकरण, तसंच परप्रांतीय महाराष्ट्रात स्थायिक झाल्यामुळेच महाराष्ट्र प्रगतिपथावर आहे, ही गोष्टही आपल्याला विसरून चालणार नाही. परंतु महाराष्ट्रात आलेल्या अमराठी लोकांमध्ये मराठीचा प्रसार करणं, हे प्रत्येक मराठी भाषकाचं कर्तव्य आहे, असं मला वाटतं.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें